top of page
काय वाचावं?
दहीहंडीच्या नावाखाली बाहेरचा तमाशा पाहता काही वर्षांपूर्वी वाचलेले युगंधर हे पुस्तक पुन्हा काढून त्यामधील काही पानं चाळून पहावी वाटतं.
ध्यान करणे म्हणजे मन एकाग्र करणे असा सोपा अर्थ मला वाटतो. इतर विचार मनामध्ये न येऊ देता मन शांत करण्यासाठी ध्यानाच्या अनेक पद्धती आहेत. माझ्यासाठी पुस्तक वाचन हेच मला एक प्रकारचे ध्यान वाटते.
सलील कुलकर्णी मुलाखती मधून आमच्यावर एक प्रकारचे संस्कारच घडवत असतात. या माणसाचे शब्द कितीही वेळ ऐकत बसलो तरी कंटाळा येत नाही. लहान मुलांचे मन समजून घेणारा असा माणूस मला लहानपणी शाळेत गुरू (शिक्षक हा शब्द जाणीवपूर्वक टाळत आहे कारण शिक्षक की शिक्षा आठवते) म्हणून लाभले नाहीत याची फार मोठी खंत वाटते.
प्रत्येक व्यक्तीच्या स्वभावकडे सकारात्मक दृष्टीने कसे पहावे हे मला पु.ल. देशपांडे यांच्या कथाकथन आणि लिखाणातून समजले.
‘कर्मचारी’ – व.पू.काळे तीच ती नोकरी, तो कामाचा व्याप, कामाच्या ठिकाणी जाण्यासाठी करावी लागणारी प्रवासातील कसरत, पुरेसा मोबदला मिळत नाही ही भावना, रोज एकच काम करून झालेले यांत्रिकी जीवन या सगळ्या गोष्टींना असणारी दुसरी सकारात्मक बाजू आपल्यापुढे मांडणारे हे एक पुस्तक.
जी.ए. कुलकर्णी हे नाव त्यांच्या जन्मशताब्दी निमित्ताने मागील काही महिन्यात बऱ्याचदा वृत्तपत्रामध्ये वाचनात आले. मग जीए समजून घेण्यासाठी त्यांची पुस्तके (रक्तचंदन, काजळमाया) वाचू लागलो. यातील कथांमध्ये जीवनाचे अविभाज्य भाग असलेले निराशा, दुःख, पश्चाताप या भावना ठासून भरलेल्या आहेत.
‘वपुर्झा- व. पु. काळे’ हे एकमेव असे पुस्तक असेल कि ज्यामध्ये कोणतेही पान उघडून वाचायला सुरु करू शकता. आजच्या पिढीच्या भाषेत सांगायचे म्हणजे हे पुस्तक इंस्टाग्रामवरील रिल्ससारखे आहे. काही सेकंदाचे रिल्स जसे आपल्याला खिळवून ठेवतात तसेच ह्या पुस्तकातील छोटे-छोटे परिच्छेद आहेत. ज्यांना वाचनाची आवड नसेल आणि एका जागी बसून पुस्तक वाचणे जमत नाही अश्या लोकांनी ह्या पुस्तकापासून सुरुवात करावी.
काही लोकांना पुस्तकं भेट मिळतात. काही लोक सांगतात कि त्यांना कोणीतरी घरी बोलावून कपाटातील हवे तेवढे पुस्तके घेऊन जाण्यास सांगितले. अशी दानशूर लोकं माझ्या आयुष्यात का येत नाहीत हेच काही कळत नाही.
काही पुस्तके अशी आहेत की ते वाचल्यानंतर आपण त्या पुस्तकातील गावाचा एक भाग होऊन जातो. त्या गावातील व्यक्तिरेखा आपल्याला ओळखीच्या वाटू लागतात. १. माणदेशी माणसं – व्यंकटेश माडगूळकर २. मालगुडी डेज – आर के नारायण
आणि कृष्ण म्हटलं की फक्त लोणी चोरणारा, गोपिकांमध्ये रमणारा, रसलीला करणारा हेच अधिक भडक करून आजकालच्या टिव्ही मालिका दाखवतात. प्रियकराच्या पलीकडे तो एक उत्तम योद्धा, सारथी, ज्ञानी, कला संपन्न व्यक्ती होता. कृष्ण समजून घ्यायचा असेल तर शिवाजी सावंत यांचे ‘युगंधर’ हे पुस्तक वाचावे.
जे कृष्णमूर्ती आणि भालचंद्र नेमाडे यांना त्यांच्या पुस्तकातून समजून घेण्याचा हट्ट सोडून द्यावा असं वाटतंय आता.
कलेजमध्ये शिकताना पुढील आयुष्याला वळण देण्यासाठी वाचावीत अशी पुस्तके… १. द आंत्रप्रेन्यूअर- शरद तांदळे. २. कोसला- भालचंद्र नेमाडे.
नेते, अभिनेते यांचा जास्त प्रभाव असणाऱ्या लोकांच्या झुंडीत मी मात्र व.पु., पु.ल., वि.स. अशा व्यक्तींच्या विचारांनी झालो वेडा. मग हा समाज मला सामावून घेईल कसा?
ज्यांचं लग्न ठरलंय किंवा नुकतंच लग्न झालंय अशा लोकांसाठी काही पुस्तके… १. पार्टनर- व पु काळे २. जळालेला मोहर-वि स खांडेकर
‘श्यामची आई’ हे पुस्तक लहान मुलांची ‘भगवद्गीता’ आहे.
आजपर्यंत वाचलेल्या सेल्फ-हेल्प पुस्तकांपेक्षा प्रभावी कथा/कादंबरी वाचूनच आयुष्यात जास्त बदल झाला असे वाटते.
काही पुस्तकं वाचताना आपण फक्त वाचक न नसतो, ‘Time Travel’ सारखं काहीतरी होऊन आपण त्या पुस्तकातील घटनेचा एक भाग होऊन जातो.
लहानपणी गावात एखादा वेडा माणूस आला की खूप अभ्यास करू न किंवा पुस्तकं वाचून त्याला वेड लागलंय असं लोक म्हणायचे, पण आता मोबाईल हातात मिळाला नाही की वेड्या सारखं वागणारी लहान मुलं दिसतात.
पुस्तक बोध – ययाति: एखद्या वाईट सवयीचा आतिरेक म्हणजे व्यसन व त्यातून मिळणारा आनंद हा समुद्रकिनाऱ्यावरून पाहता मावळतीकडे झुकणाऱ्या सूर्यासारखा मोहक वाटतो. पण त्याचं अस्तित्व काही क्षणापुरतं आहे हे विसरून आपण त्याला पकडण्यासाठी समुद्रात स्वतःला झोकून देतो. चंचल मनाच्या लाटा आपल्याला पुन्हा किनाऱ्याकडे येऊ देत नाहीत. आणि इथे सुरू होते स्वतःशीच लढाई.
मराठीमध्ये अनुवादित Self-Help इंग्रजी पुस्तकांचा भडीमार जास्त झाला आहे.
युगंधर, राधेय, रावण (शरद तांदळे लिखित) आणि मेहुलाचे मृत्युंजय ही पुस्तके वाचल्यानंतर श्रीकृष्ण, महादेव, कर्ण, राम आणि रावण यांच्यासोबत आपला संवाद सुरू होतो…
सेल्फी आणि ट्रोलिंगच्या काळात वपु काळे आणि वाचक यांच्यातील पत्रव्यवहारांचा संग्रह असलेलं ‘प्लेझर बॉक्स’ सारखं पुस्तक वाचणं म्हणजे सुख…
bottom of page