top of page

लहानपण देगा देवा

Updated: Mar 21

नकाशावर काढलेला ठीपकाही मोठा वाटेल एवढ्या छोट्या खेड्यात माझं बालपण गेलं. तेव्हाच्या सगळ्या गोष्टी जशाच्या तशा आठवत नसल्या तरी जिथे राहत होतो तिथला काही भाग, काही घटना थोड्या आठवतात. लहानपणी ज्यांच्याकडे आमचं कुटुंब भाड्याने राहत होते, माझा बराचसा वेळ त्या काका काकूंच्या घरी जात असे. त्यांच्या घरातील एकही भाग असा नव्हता की जिथे मी रांगत रांगत अभिषेक घातला नसेल. ‘ लहानपण देगा देवा । मुंगी साखरेचा रवा ।’ या ओळी अर्थानुसर नाही पण शब्दशः मी अनुभवल्या आहेत. कारण ते काका नेहमी कुठेना कुठे सत्यनारायण पूजा करून आले की माझ्यासाठी पूजेचा दुधातुपातील भरपूर साखर घातलेला शिऱ्याचा प्रसाद घेऊन येत असत. माझं नावही त्या काकूंनी माझ्या काळ्या वर्णावरून कृष्णाचं एक दुसरं नाव ठेवलं आहे. त्या काळी कुटुंबातील सदस्य व्यतिरिक्त इतरांना माया करण्याबरोबरच त्या व्यक्तीवरचा हक्कही मुक्तपणे दिला जात असावा. कोणत्याही शेजाऱ्यांनी यावं उचलून घेऊन जावं, आपणही त्यांच्या घरी जाऊन हवं ते खावं असा तो काळ होता. त्या वयात आपण सगळ्यांनाच फक्त माणूस म्हणून ओळखत असतो कारण त्यातला गरीब, श्रीमंत, जाती असल्या गोष्टी आपल्या विश्वात नसतात. शाळा नावाचं भूत तेव्हा एवढ्या लहानपणी मानगुटीवर बसत नव्हतं. खेळणी हा प्रकार तेव्हा अस्तित्वातच नव्हता, जे हाती येईल ते खेळणं होत असे. तेव्हा काडेपेटी घेऊन त्याला गाडी समजून खेळणारा मी आणि आता गाडीतून कामाला जाणारा मी या दोघांमध्ये खूप फरक आहे. शरीर तेच असलं तरी मन मात्र अश्रूच्या महापुरात, अपमानाच्या आगीत, जहरी शब्दांच्या जखमांनी संपूर्ण बदलून गेलंय. आम्हाला चांगल्या शाळेत घालता यावं म्हणून वडिलांनी आम्हाला घेऊन ते गाव सोडलं. नंतर कधी त्या गावी जाणं झालच नाही. काही कार्यक्रमानिमित्त त्या काका काकूंची भेट होत असे. पण ते दोघेही आता जास्त वय झाल्यामुळे थकले आहेत. आमच्या घरी माझ्या लहानपणीचे विषय निघाले की त्या काका काकुंच नाव आल्याशिवाय तो विषय पूर्णच होऊ शकत नाही. कोणत्याही नात्याविना आपण एखाद्या लहान मुलावर तेवढ्याच निरागसपणे प्रेम करू शकतो हे त्यांच्याकडून मी नकळतपणे शिकलो.

Comments

Rated 0 out of 5 stars.
No ratings yet

Add a rating
bottom of page