top of page

मी आणि पैसा

माझी आणि पैशाची दोस्ती कधीच झाली नाही. इथे माझा खिसा नेहमीच रिकामा राहिला, नव्हे मीच माझ्या खिशाला कात्री लावली असे म्हटले तरी ते चुकीचे नाही.


सर्वसामान्य घरातील, साधारण पगारावर काम करणारा मी. पहिल्यांदा नोकरीला लागल्यावर एक मित्र भेटला, तो म्हणाला अरे काय आयुष्यभर नोकरी करणार का. त्यापेक्षा शेअर मार्केट मध्ये पैसे टाक, दिवसाला पाचशे रुपये मिळतील. ज्याला दिवसभर राबून तीनशे रुपये मिळतात तो माझ्यासारखा अशा स्वप्नांना लगेच मिठीत घेतो. पूर्वी निर्देशांक घसरले का वधरले असली माहिती बातम्यांच्या शेवटी टीव्हीवर सांगितली जात असे आणि एक मोठी इमारत, त्याबाहेर LED स्क्रीनवर फिरणारे आकडे आणि एक बैल असलं काही दाखवलं जात असे. लहानपणापासून 'कष्ट केल्याशिवाय पैसे कमावता येत नाहीत' हेच सांगणारे लोक आजूबाजूला होते, ते लोकांचं सांगणं आता खोटं वाटू लागलं, कारण शेअर मार्केट मधून झटपट पैसे कमावता येतील अशी आशा होती. आणि मग सुरू झाला फ्युचर अन् ऑप्शनचा खेळ. हा खेळ फक्त बनवलाच असा आहे की यामध्ये कोणी जिंकू शकत नाही. पण हे समजायला बचत केलेले सगळे पैसे, आज ना उद्या प्रॉफिट होईल या आशेवर इतरांकडून उसने घेतलेले सगळे पैसे संपवून टाकले होते. दहा पैकी नऊ लोकांना फ्युचर अँड ऑप्शन मध्ये लॉस होतो अशी चेतावणी प्रत्येक ट्रेडिंग अँप वर सेबी मार्फत दिली जाते. सिगारेटच्या बॉक्सवर कर्करोग झालेल्या तोंडाचे चित्र छापलेले असते, ओढणाऱ्यालाही ते माहिती असते, पण ती सवय जात नाही. त्यातलाच हा FnO चा प्रकार आहे, झालेल्या लॉसच्या दलदलीतून प्रॉफिट होईल या आशेवर धडपडलो तर त्या दलदलीत माणूस अजून रुतत जातो.


मागे एकदा तीन माणसे जोडा आणि पैसे कमवा असल्या चेन मार्केटिंगमध्ये, 'एका वर्षात पैसे दुप्पट' करून देणाऱ्या कंपनीमध्ये, आभासी चालनामध्ये, पैसे भरून  मार्केटच्या टिप्स घेण्यामध्ये, जेवढे पैसे घालवले त्याचा हिशोब न सांगितलेला बरा. या सगळ्यामध्ये एकाच साम्य आहे ते म्हणजे इथे तुम्हाला झटपट श्रीमंतीची स्वप्न दाखवली जातात आणि आपण फसतो.


सध्या सोशल मीडियावर फायनान्सियल इन्फ्लुएन्सर्सचा सुळसुळाट आहे. स्वतःच घर घेण्यापेक्षा भाड्याच्या घरात राहणं कसं फायदेशीर हे सांगणारे बरेच व्हिडिओ आहेत. ही लोकं असल्या व्हिडिओमधून बक्कळ पैसे कमवतात आणि काही दिवसानंतर त्यांच्याच सोशल मीडियावर स्वतःच्या नवीन विकत घेतलेल्या फ्लॅटच्या पूजेचे व्हिडिओ टाकतात. इन्स्टाग्रामवर असाच कोणी स्वयंघोषित अर्थतज्ज्ञ सांगतो पुढच्या वर्षी सोने दोन लाख पार होईल, तर दुसरा कोणी सांगतो सोने परत साठ हजार रुपये होणार. या इन्फ्लुएन्सर्सचा अजून एक आवडीचा विषय म्हणजे Early Retirement. अमुक अमुक पैसे एवढ्या वर्षापर्यंत SIP आणि मग SWP चालू करून चाळीशीत निवृत्त व्हा असं काही त्याचं गणित असतं. लवकर निवृत्ती घेणे मला जमणार नाही कारण एखादा दिवस घरी सुट्टी घेऊन राहिलो तर घरातील लोक मला वैतागतात  आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे रोज ऑफिसात साहेबाच्या शिव्या खाल्ल्याशिवाय मला जेवण जात नाही, त्यामुळे चाळीशीत रिटायर होण्याचा माझा सध्या तरी विचार नाही. हे सगळे इन्फ्लुएन्सर्सचे व्हिडिओ बघून त्यांच्या लाखो रुपयांच्या गप्पा ऐकून स्वतःला खूपच गरीब आणि अडाणी (अदानी नव्हे) समजू लागलो होतो.


पूर्वी पैसे गुंतवण्याचे फार पर्याय लोकांकडे नव्हते, पण आता शेकडो पर्याय उपलब्ध आहेत. मोबाईलवर एका क्लिकमध्ये पैसे गुंतवणे सोपे झाले असले तरी कुठे गुंतवणूक करावी याची समज आपल्यालाच असायला हवी.

Comments

Rated 0 out of 5 stars.
No ratings yet

Add a rating
bottom of page