top of page

राजकारणाचा क्रॅश कोर्स

प्रिय नातू,


नुकताच तू जन्माला आलास आणि तुला दवाखान्यातून घरी नेण्यासाठी मी १२ कोटीची गाडी विकत घेतली. आता त्या गाडीच्या मागच्या काचेवर मी अमुक अमुक जातीचा कामगार नेता असं लिहून घेणार आहे. म्हणजे कसं त्या जातीची लोकही खुश आणि कामगारही खुश. तसं म्हटलं तर माझे आजोबा कामगार होते, मी राजकारणाच्या जीवावर बिजनेसमन झालो आहे पण सहनभूती आणि मत मिळवायची म्हणजे स्वतःला गरीब म्हणवून घ्यावं लागतं. ह्याच आलिशान गाडीत बसून मी जेवण करतानाचे विडिओ बनवून व्हयरल करेल, कामात फार व्यस्त असल्याचा आव आणेल.


असो विषय भरकटला, तुला पत्र लिहिण्यामागच कारण म्हणजे तू माझा नातू म्हणजे तूही राजकारणात येणार, म्हणजे तुला यावेच लागेल. कारण जोपर्यंत आपण राजकारणात आहोत तोपर्यंत सुरक्षित आहोत, नाहीतर कधी कोणती फाईल बाहेर निघेल आणि मला जेलवारी होईल सांगता येत नाही. इतर क्षेत्रासारखं आपलं नाही, म्हणजे डॉक्टरच्या मुलाला डॉक्टर व्हायचं असेल तर ते शिक्षण घ्यावं लागत, पण राजकारणात तसं नाही.


निवडून येण्यासाठी फार काही विशेष प्रयत्न करावे लागत नाहीत, तुला काही राजकारणाचे नियम सांगतो.  सर्वांगीण सुधारणेच्या लफड्यात पडू नये. स्वतःला विशिष्ट जातीचा, शेतकऱ्यांचा, कामगारांचा, विशिष्ट भाषेचा, प्रदेशाचा नेता म्हणवून घेत त्या जमावाचा पुढारी होऊन सुरुवात करणे. समाजा आपल्या चुकीमुळे कोणी आपल्यावर आरोप केले तर म्हणायचं मी अमुक अमुक समूहाचा नेता आहे म्हणून विरोधक माझ्यावर टीका करतात आणि हेच सतत घोकत राहायचं आणि मूळ मुद्यापासून विषयांतर करून स्वतःची सुटका करून घ्यायची.

नेत्यासाठी कार्यकर्ता महत्वाचा. त्यात ज्याचे कार्यकर्ते जास्त बुद्धीने पांगळे तेवढा नेता मोठा होत जातो. हा कार्यकर्ता घरी स्वतःच्या आईवडिलांना कधी विचारणार नाही पण माझ्यासारख्या नेत्याला बाप म्हणवून घेत फिरेल. कार्यकर्त्याला सोबत एक फोटो काढू दिला तरी तें खुश होतात, आणि 'भेटला विठ्ठल' असं गाणं लावून तो फोटो स्टेटसला ठेवतात. 


निवडणुकीआधी म्हाताऱ्या लोकांसाठी अष्टविनायक यात्रा, महिलांना मोफत घरगुती सामान वाटप आणि पुरुषांसाठी सोमरस. बास एवढ जरी केलं तरी आपण जिंकून येणारच. स्वार्थ साधायचा म्हणजे परमार्थ करावा लागतो. राजकारणात जिथे गर्दी तिथे फायदा. आणि गर्दी कुठे होते, सणांमध्ये, उत्सवांमध्ये. मग काय मंडळांना भरपूर रसद पुरवायची. डीजेच्या थप्प्या रचायच्या, एखादी नृत्यांगना बोलवायची आणि त्या तालावर जनता नाचवायची. तुला म्हणून सांगतो मी पुरुष असूनही एकदा संक्रांतीसाठी सामूहिक हातदीकुंकू आयोजित करून स्वतः कार्यक्रमाचा स्वतः अध्यक्ष झालो होतो, काय करणार मतांसाठी करावं लागत.

प्रत्येक सणाला शुभेच्छा देणारे फ्लेक्स गावभर लावायचे, आपण शुभेच्छा दिल्या नाहीत म्हणून लोक सण साजरे करणार नाहीत असे नाही, पण सतत लोकांना आपण दिसलो पाहिजे अशी सोय करायची. बरं ते फ्लेक्स लावायला फार कष्ट घ्यायची  गरज नसते, आधीच खड्डे पडलेल्या रस्त्यांच्या कडेच्या खड्यात बांबू रोवून फ्लेक्स लावायचा. 

लोकांच्या नजरेत सतत राहण्यासाठी अजून एक उपाय आहे, बागेत बसायचे बेंच देऊन किंवा दिशादर्शक फलक लावून त्यावर 'संकल्पना' असं म्हणून स्वतःच नाव लिहून घ्यायचं. आचारसंहितेच्या वेळी त्यावर अधिकारी चिकटपट्या लावून विद्रुपीकरण करत पण त्याला आपला नाईलाज आहे. तसं म्हंटल तर आचारसंहिता आपल्या फार फायद्याची गोष्ट आहे, कारण जेव्हा आपण मत मागायला जातो, लोकं कामं सांगतात, अशा वेळी फक्त म्हणायचं सध्या आचारसंहिता आहे कोणत काम करून देता येणार नाही, मला निवडून द्या मग करून  घेऊ, आणि एकदा का निवडून आलो कि पुढची पाच वर्ष तोंड पण दाखवायला जायचं नाही. सगळीकडे आपली उपस्थिती दाखवायची, 'भूमिपूजन', 'लोकार्पण सोहळा' असले कार्यक्रम सतत करत राहायचे, गावात साधं गटारीचे काम सुरु करायचे असले तरी ते आपल्याच हस्ते झालं पाहिजे. कार्यकर्त्यांच्या शक्य तेवढ्या लग्नकार्याला, दहाव्यांदा उपस्थित राहून भाषण ठोकायच.


एवढं सगळं करत असताना राजकारणी म्हणून काहीतरी चुकणारच, तोंडातून काहीतरी वादग्रस्त वक्तव्य बाहेर पडणार, इकडचे पैसे तिकडे होणार, आणि त्याची चर्चा होणार. पण अशा वेळी खचून जाऊ नये, कारण या जनतेची स्मरणशक्ती कमी असते. एखादी घटना घडली कि त्याची  चर्चा होते आणि तोपर्यंत दुसरी कोणतीतरी मसालेदार घटना घडते आणि लोक आधीच विसरून नवीन घटनेकडे लक्ष वळवतात. असो थांबतो आता.


marathi politicals

Comments

Rated 0 out of 5 stars.
No ratings yet

Add a rating
bottom of page