top of page

कत्तली

झाडांच्या कत्तली करायच्या आणि वरून यंदा उन्हाळा जरा जास्त जाणवतोय यावर चर्चा करायची. दर उन्हाळ्यात फोटो फिरतात, की कोणीतरी चौकात सिग्नलसाठी थांबलेल्या लोकांना ऊन लागतंय म्हणून ग्रीन नेट बांधले आहे. ते सगळं ठीक आहे, चांगला उपक्रम आहे. पण हे म्हणजे त्वचा रोग झालेल्या ठिकाणी औषध न लावता मेकअप करण्यासारखी तात्पुरती उपाययोजना झाली.


रस्त्याच्या रुंदीनुसार कडेला किती अंतरावर झाडे लावायला हवीत याचे काही नियम आहेत. ते बऱ्याच लोकांना माहिती नाहीत. साधारपणे प्रत्येक दहा मीटर वर एक झाड लावावे असे ट्री ऍक्ट मध्ये नमूद केलेले आहे. झाडांच्या बुंध्याजवळ एक मीटर मध्ये काँक्रिट करू नये असा पण नियम आहे. तरी सर्रासपणे याकडे दुर्लक्ष केले जाते. रस्ता रुंदीकरण मध्ये काढलेली झाडे ट्रान्सप्लांट केल्यानंतर किती झाडे जगतात बाबतही अजून ठोस माहिती नाही.


G20 वेळी पुणे शहरात लावलेली किती झाडे जगली? त्यावेळी शहरातील उड्डाण पुलावर मोठमोठ्या कुंड्यात झाडे लावली होती, पण पाण्यावाचून ती जाळून गेली.


पर्यावरणाचे रक्षण म्हणजे मोठी झाडे वाचवणे आणि लावणे असा साधारणपणे समज आहे. अशी झाडे असली म्हणजे त्यावर पक्षी येऊन राहतील हा असा समज चुकीचा आहे. आपण अन्नसाखळी म्हणजे काय हे खूप लहानपणी शाळेत शिकलो आहोत. त्यामुळे इतर छोटी झाडे, गवत, किडे, मुंग्या या अन्नसाखळीतील सगळ्याच गोष्टी पर्यावरणाचा भाग आहेत.


PMC चे साहेबांसोबतचे एक संभाषण,

मी : साहेब, त्या फुटपाथ शेजारी असलेल्या झाडे लावायच्या पट्टीवर पेव्हिंग ब्लॉक बसवले जात आहेत. छोटी झाडे पण तोडली जात आहेत.

साहेब : बरं मग.

मी : तिथे पेव्हिंग ब्लॉक बसवायची गरज नाही, ट्री ऍक्ट नुसार ती जागा झाडांसाठी आहे.

साहेब : तिथे गवत उगवते, ते दिसायला चांगले वाटत नाही म्हणून पेव्हिंग बसवून घेत आहे.

मी : तिथे बाजूच्या रस्त्याला खड्डे पडले आहेत ते पण बरे वाटत नाहीत, मग ते का भरून घेत नाही?

साहेब : आता काम बंद करता येणार नाही, नंतर बोलू (फोन कट).


असे अनेक प्रसंग आहेत....


एकंदरीत काय तर विकास की पर्यावरण या प्रश्नाचा समतोल साधणे गरजेचे आहे. झाडांच्याही जाती असतात पण दुर्दैवाने त्या जातीवरून माणसांमध्ये भांडणे लावता येत नाहीत, म्हणून तिकडे कोणी लक्ष देत नाही.

Comments

Rated 0 out of 5 stars.
No ratings yet

Add a rating
bottom of page