top of page

मुले

Updated: Mar 20

आजकालच्या लहान मुलांशी बोलताना माझ्या सारख्याची खूप अडचण होते. मी ‘लाल फुगा’ म्हणालो तर मुलं वेड्यासारखी बघतात, मग कळते ‘रेड बलून’ म्हणावं लागतं ते. आईस्क्रीमचे मला पिस्ता, चोकलेट ऐवढेच काय ते प्रकार मला माहित आहेत. पण ह्या मुलांना माहीत असलेले प्रकार इथे लिहायला सुद्धा मला जमणार नाही, उच्चारणे तर त्याहून अवघड. आता ‘ड्रॅगन’ नावाचं फळ असते हे मला कसे माहीत असणार पण हे मला चिमुकल्यांनी सांगितले, कारण माझी पोहोच फार फार तर सफरचंद पर्यंत. आता मुलांनी शाळेत अभ्यास केला तर ‘टीचर’ मुलांच्या हातावर स्टार वैगेरे काढतात, आमच्या वेळी काहीही करा छडीचे लाल व्रण हातावर टॅटू काढल्याप्रमाणे ठाण मांडून असत. मला माहित असलेल्या एकमेव इंग्रजी कवितेतील ‘शुगर’ खाऊन ‘येस पप्पा’ म्हणणारा ‘जॉनी’ पण आता कालबाह्य झाला आहे. आता त्याच जॉनीचा मुलगा ‘किंडर जॉय’ वगैरे खात असेल. पिझ्झाची ऑर्डर देताना मी ‘एक पिझ्झा द्या’ एवढंच सांगू शकतो, पण ही मुलं त्या पिझ्झा वर काय काय टाकायचे ते पटापट सांगतात. सगळ्याच गोष्टी ह्या मुलांना माहीत असतात, माझ्याकडे त्यांना नवीन सांगण्यासारखे काहीच नसते उलट मीच त्यांच्याकडून बरेच काही शिकत असतो.

Comments

Rated 0 out of 5 stars.
No ratings yet

Add a rating
bottom of page