top of page

द्या मत ठोकून

Updated: Apr 19

‘राजकारण’ हा एक असा विषय आहे कि ज्यासंबंधी चर्चा करायला तुम्हाला अक्कल असावीच लागते असे नाही. सहज वेळ मिळाला कि गावातल्या कट्ट्यावर, बस थांब्यावर, सहकाऱ्यांबरोबर अथवा समाज माध्यमांवर तुम्ही ह्या विषयी सल्ले देऊ शकता, कोण चूक-बरोबर ह्याचं मोजमाप करू शकता. भले आपण जिथे ह्या गप्पा मारतो तेथील रस्त्यांना त्वचारोग झाला असेल, गटारांचा जीव गुदमरला असेल, कारखान्यातील रासायनिक पाणी नदी-नाले गिळत असतील, कचऱ्याचा ढीग सुगंध पसरवत असेल तरी आपण असल्या क्षुद्र गोष्टींकडे दुर्लक्ष करून कोणाची सत्ता येणार यावर तोंडातील ‘केशर’ची पिचकारी मारून वा चहा बरोबर धूर सोडत आपली ठाम मतं मांडत राहायची.

आपल्या मागील सात पिढ्यात कोणी साधे ग्रामपंचायत सदस्य झाले नसेल तरी आपण राष्ट्रीय नेत्याबद्दल बोलत राहावे. जरी आपण ज्याला पाठिंबा देतो तो नेता रात्रीतून दुसऱ्या पक्षात गेला तरी तो जनतेच्या भल्यासाठीच कसा गेला हे स्वतःच्या मनाला पटत नसेल तरी दुसऱ्यांना पटवून सांगता आले पाहिजे, ह्यासाठी ज्यांच्यासोबत आपली रोजची ऊठबस असेल अश्या लोकांसोबत वैर घेण्याची पाळी आली तरी चालेल.

Comments

Rated 0 out of 5 stars.
No ratings yet

Add a rating
bottom of page