top of page

मेहनत

Updated: Mar 20

आयुष्यात कधी फार मेहनत घ्यावी लागली नाही, सगळं काही सहज होत गेलं. माझं आयुष्य एकदमच सामान्य आहे. तोंडात सोन्याचा चमचा नसला तरी अगदी उपासमारीची वेळही कधी आली नाही. नशिबाची आणि माझी लहानपणापासून चांगलीच गट्टी जमली आहे. अभ्यास करायला व्यवस्थित दिवे वगैरे होते, अभ्यास करून मी आयुष्यात फार काही दिवे लावले नाहीत तो भाग वेगळा पण कधी रस्त्यावरील दिव्याखाली बसून अभ्यास करावा लागला नाही. फी भरली नाही म्हणून कधी कोणी वर्गातून बाहेर काढले नाही की शाळेसाठी जंगलातून नदी वैगेरे पार करून जावे लागले नाही. कधी नापासही झालो नाही अन् कधी कोणते पारितोषिक पण मिळवले नाही. काहीतरी आयुष्यात वेगळं घडेल ह्या आशेने भविष्य बघितले तर तिथे पण सगळे ग्रह आपापल्या चौकोनात व्यवस्थित बसले आहेत. मला आयुष्याने खूप छळलं नाही की फार डोक्यावरही घेतले नाही. नशिबात विदेशी दौरे करण्याचा योग जसा अजून आला नाही आणि राहतो तिथे कधी तोंड लपवत फिरावे लागले नाही. शेती नसल्यामुळे बांधावरून भावकी बरोबर भांडणे नाहीत आणि स्थावर मालमत्ता नसल्यामुळे वाटणी वरून कोणत्या कोर्ट काचेऱ्यात जावं लागलं नाही. पण हे टिव्ही वर मालिकांमध्ये दाखवतात त्या लोकांच्या जीवनात सारखं काही ना काही विचित्र घडामोडी घडत असतात आजकाल तर दर आठ एपिसोड नंतर घटस्फोट होतात आणि पुन्हा त्यांची नव्याने लग्न होतात माझ्या आयुष्यात तसे काही होत नाही. कोणी माझ्या प्रेमात पडले नाही, मग कोणी सोडून जाण्याची भीती नाही कि विरहाचे दुःख नाही त्यामुळे गुलाबी थंडी, रिमझिम पाऊस , कोवळे ऊन असल्या गोष्टींना माझ्या आयुष्यात काही स्थान नाही. मुळात बऱ्याच बाबतींमध्ये माझी अशी काही ठाम भूमिका नसते जसे कि चहा की कॉफी? या हॉटेलची मिसळ चांगली की त्या हॉटेलची? अमुक रंगाच्या शर्ट वर तमुक रंगाची पँट? ह्या असल्या सगळ्या प्रश्नांना माझं एकच उत्तर असते ‘काहीही चालेल’. भविष्यात माझ्या नातवंडांना मी आयुष्यात किती कष्ट उपसले हे सांगायला माझ्या कडे काहीही नसेल. मला उतारवयात आत्मचरित्र पण लिहिता येणार नाही कारण ज्यामधे भयाण कष्ट नाही ते काय थोडीच कोण विकत घेऊन वाचेल. दवाखान्यातील मशीनवर हृदयाचे ठोके सरळ रेषेत दिसेपर्यंत माझे हे आयुष्य असेच सरळच जात राहील असे वाटते.

Comments

Rated 0 out of 5 stars.
No ratings yet

Add a rating
bottom of page