top of page

पुणेकर

Updated: Apr 19

   पुणेकर आणि इतर असे दोनच प्रकारचे लोक या शहरात राहतात. आपण मूळचे पुणेरी आहोत हे अप्रत्यक्षपणे सांगण्यासाठी ‘बाहेरून आलेल्या लोकांमुळे पुण्यात गर्दी वाढलीय’ या वाक्याची जपमाळ सतत ओढत राहावी लागते. मीपण हल्ली उगाचंच लोकांना मी पुणेकर असल्याचं दाखवण्यासाठी दाटीवाटीने उभ्या असलेल्या कोणत्याही उंच इमारातींकडे बोट दाखवून ‘पूर्वी इथे मोकळं मैदान होत, आम्ही इथे क्रिकेट खेळायचो’ असली वाक्य बिनधास्त बोलतो. बाकी काही असो पण ‘पुणे पूर्वीसारखं राहिलं नाही’ हे ज्याच्या तोंडून येतं तो खरा पुणेरी. 

     लहानपणी कधीतरी पहिल्यांदा पुण्यात आलो होतो तेव्हा तुळशी बागेत जायचं ठरल्यावर तिथे मोठी बाग असेल असं माझ्या बालमनाला वाटलं होतं. पण तिथे गेल्यावर ‘शंभर खूप होतात, वीस रुपयाला द्या’ असली वाक्य दुकानदारांच्या तोंडावर फेकणाऱ्या बायकांच्या गर्दीत ‘बाग’ या शब्दावरून माझा विश्वास उडाला. इथे भाव कमी करण्याच्या बाबतीत मात्र सर्वच ठिकाणच्या स्त्रियांची एकवाक्यता दिसून येते.

     पुण्यात कबुतरांसारखी इथे शिकायला येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या झपाट्याने वाढते आहे. मीपण कॉलेजच्या निमित्ताने या शिक्षणाच्या माहेरघरी आलो आणि सासरी न जाणाऱ्या मुली सारखा इथेच राहिले. इथेच शिकलो, नंतर लाखो लोकासारखी हीच माझी कर्म भूमी झाली.

    जेव्हा या शहराच्या विकासाच्या गप्पा (की थापा?) राजकारणी लोक मारत होते तेव्हा मीही स्वतःच्या प्रगतीची स्वप्न बघत होतो. पण आम्हा दोघांच्याही नशिबात विश्वासघात लिहिलेला होता; पण आम्ही अजूनही अशा बाळगून आहे. पुण्याची दुचाकीचे शहर म्हणून ओळख आहे, पण सध्याची परिस्थिती पाहता काही दिवसांत पुणे टँकरचे शहर म्हणून ओळखले जाईल. भर पावसाळ्यात धरणं भरून वाहत असतात, पुराच्या बातम्या असतात, पण टँकरची संख्या काही कमी होत नाही. 

   या शहरात जेवढे सांस्कृतिक कार्यक्रम होतात तेवढे अजून कोणत्या शहरात होत असतील असं मला वाटतं नाही. पुण्यात कशाचीच कमी नाही. पुण्याने आपल्याला बरचं काही दिलं. संस्कृती दिली, उद्योग दिले, एक ऐतिहासिक प्रेमकथा दिली, खड्डे दिले, स्वप्न दाखवली, हेल्मेट सक्ती झुगारून दाखवली, शिक्षण दिले, करोडो रुपयांची घरे दिली, आणि बरंच काही दिलं. जंगलात राहणाऱ्या प्राण्यांनी जंगलाला आग लाऊन बोंब मारू नये. तसं आपणही या शहराला फक्त नावं न ठेवता आपल्या वागण्यातून या शहराला परतफेड करण्यासाठी स्वच्छ्ता, शिस्त, नियम पाळून आपली बाजू भक्कम करण्याची गरज आहे.

1 Comment

Rated 0 out of 5 stars.
No ratings yet

Add a rating
Rated 5 out of 5 stars.

खरय

Like
bottom of page