top of page

ती

Updated: Apr 19

आज 'ती'चा दिवस. सगळे ग्रुप वर शुभेच्छा देतील, स्टेटस ठेवतील. आणि जेवताना भाजीत मीठ जास्त झालं म्हणून तिच्या नावाने चिडचिड करतील. आहो घरातलं तर सोडाच, पण महाराष्ट्रातल्या एका मुख्य नेत्याच्या बायकोने काय बोलू नये, कुठे कसे कपडे घालावे यावर आपण इथे बसून चर्चा करतो. दुसऱ्यांच्या बायकांनी काय करावं हे ठरवणारे आपण घरातील स्त्रीला कितपत स्वातंत्र्य देत असू यावर एकदा विचार व्हावा. आज देशाची अर्थमंत्री महिला आहे, पण आजही फक्त राखीव जागा आहे म्हणून सरपंच झालेल्या महिला आणि खरा कारभार बघणारे त्यांच्या घरातील पुरुष हे काही नवीन समीकरण नाही.


तिला स्वातंत्र्य आहे अशा आशयाचे मेसेज टाकणारे आम्ही, आणि सोशल मीडियावर तिला कॉमेंट बॉक्स मध्ये ट्रोल करणारेही आम्हीच. तिच्या सोबत एखादी घटना घडल्यावर सोशल मीडियावर न्यायधीशाचा अवतार घेऊन तिची चूक दाखवणारेही आम्हीच. तिथे न्यायदेवतेच्या डोळ्यांवर पट्टी बांधली आहे आणि इथे आम्ही तिच्या तोंडावर पट्टी बांधली आहे. सरकारचा निषेध नोंदवण्यासाठी लोकं जेव्हा बांगड्या घेवून आंदोलन करतात आणि सरकारला बांगड्या भरा असं म्हणतात तेव्हा याचा अर्थ ते महिलांनाच कमी लेखतात असा होत नाही का?  'तिला घरकामात कधीच सुट्टी नसते' किंवा 'ती घरकामातून कधीच रिटायर होत नाही' हि वाक्य टीव्हीवर ऐकायला चांगली वाटतात. पण प्रत्यक्ष मात्र तिला घरकामात मदत करणे आम्हाला कमीपणाचे वाटते. बाकी समानतेच्या गप्पा इथून पुढेही चालू राहतील.

Comments

Rated 0 out of 5 stars.
No ratings yet

Add a rating
bottom of page