top of page

चर्चा

Updated: Apr 19

लोकांसोबत विविध विषयांवर मी केलेली चर्चा ही कधी कधी माझी व्यर्थ बडबड वाटते. मला कुठल्या क्षेत्रातील माहिती कमी आहे असे समोरच्या व्यक्तीला वाटू नये म्हणून माझी ही केविलवाणी धडपड चालू असते. लोकांचा सगळ्यात आवडता विषय म्हणजे राजकारण, माझ्या घरी आज कोणती भाजी बनवायची याबाबत माझं मतं विचारत घेतलं जात नाही त्यामुळे कोणत्या विचारसरणीचे सरकार निवडून यावं याबाबत माझं मतं राजकारणावर रंगलेल्या गप्पात कसं मांडावं असा प्रश्न मला पडतो. अजून एक सर्वत्र चर्चेचा विषय म्हणजे क्रिकेट. मला अजून बॅट सुध्दा नीट धरता येत नाही, त्यामुळे भारतीय संघ मॅच कुणामुळे हरला या विषयावर खेळाडूना उद्देशून शाब्दिक शिकवणीचे सिक्सर मारणे मी टाळतो.

कोणत्या हॉटेलात काय चांगलं खायला भेटतं या विषयावर चर्चा करणाऱ्या लोकांचीही मोठी जमात आहे. ‘जे ताटात वाढलंय ते खा नाहीतर उपाशी राहा’ अशा शब्दांनी माझ्या लहानपणी पोट भरणारा मी, आता अमुक ठिकाणी हे चांगलं खायला भेटतं असल्या चर्चा करणाऱ्या खवय्यांच्या गटात मला माझ्या जीभेच्या अरसिकपणाचा राग येतो. खाण्या विषयीच्या चर्चा एखाद्या पदार्थाचा शोध आमच्या भागात कसा लागला, आमच्या गावाला हा पदार्थ किती चांगला मिळतो फक्त एवढ्यावर थांबत नाही तर तुमच्या इथे ते पदार्थ कसा पांचट बनतो इथपर्यंत असते.

द.सा.द.शे., चक्रवाढ व्याज असले शब्द शाळेत मी गणिताच्या पुस्तकात बघितले की मला घाम फुटत असे. पण आता रोज एक रुपया गुंतवला तर किती वर्षात किती करोड रुपये होतात हे तोंडी सांगणाऱ्या लोकांचं कौतुक वाटतं, कारण मला अजूनही एकावर किती शून्य म्हणजे एक करोड हे बोटावर मोजल्याशिवाय सांगता येत नाही. Early Retirement बाबत लोकांच्या आर्थिक गुंतवणूक या विषयांवरच्या गप्पा मी माझ्या खिशातील शिल्लक चिल्लर नाणी मोजत ऐकत असतो. बर या लोकांशी मी माझ्या कुवतीनुसार काही बोललो तर ‘मोठे स्वप्न बघायला शिक’ अशी चपराक मारली जाते. एकूणच माझ्या आवडत्या विषयावर गप्पा मारायला कोणी नसणे ही खूप मोठी खंत वाटते पण मुख्य प्रश्न असा आहे की माझी आवड तरी नक्की काय?

Comentarios

Obtuvo 0 de 5 estrellas.
Aún no hay calificaciones

Agrega una calificación
bottom of page