top of page

आधुनिक लग्न

Updated: Mar 23

लग्नकार्य जिथे होतात त्या वास्तूला कार्यालय न म्हणता स्टुडिओ म्हणले पाहिजे असे माझे ठाम मत आहे. कारण सध्या प्री वेडिंग शूट पासून सुरू होणारा सगळा खटाटोप फोटोसाठी असतो. अक्षदा पासून ते घोड्यापर्यंत सगळ्या गोष्टींचे कंत्राट कार्यालयाकडे असलेल्या पॅकेज पद्धती मुळे आजकाल लग्नकार्यात विशेष काम असे काही करावे लागताच नाही. फक्त प्रत्येक विधी नंतर कपडे बदलणे आणि फोटोसाठी चेहरा हसरा ठेवणे एवढेच काम करावे लागते. लग्नात इतरत्र पडलेल्या अक्षदा उचलून एकमेकांवर फेकणे, खोड्या करणारी लहान मुले भारतीय वघांसारखी नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. आता ही लहान मुले कार्यात मोबाईल हातात घेऊन शांत बसलेली असतात, पण पत्रिकेमध्ये उगाच ‘नुसतीच लुडबुड’ ह्या शीर्षकाखाली मुलांची नावे लिहून त्यांना बदनाम केलं जातं. काही कार्यात लग्नाच्या विधीपेक्षा आलेल्या प्रमुख उपस्थितांचे सत्कार समारंभ करण्यात जास्त वेळ जातो. वास्तविक पाहता हे विशेष उपस्थिती लावणारे आजी माजी मंत्री, संघटनांचे, मंडळांचे अध्यक्ष ऎन वेळी हजेरी लावतात आणि पहिल्या पंगतीला जेवण करून लगेच मार्गस्थ होतात, यात त्यांचा तरी काय दोष म्हणा कारण दुसरीकडे कुठेतरी स्मशानात भूमीत त्यांना श्रद्धांजलीचे भाषण द्यायला जायचे असते. पूर्वी कडाक उन्हात मंडपात बसून मठ्ठा प्यायला जी मजा होती ती आता एसी हॉल मध्ये नाही. बुंदी, जिलेबी हे पदार्थ पण घरातील म्हातारी सारखे दुर्लक्षित झाले आहेत. त्याऐवजी रसमलाई, रबडी.. वगैरे पदार्थांचे जास्त चोचले झाले आहेत. ह्या लग्नाच्या पॅकेज मध्ये फक्त नवरी सासरी चालली म्हणून ‘रडपी’ (जेवण वाढणारे वाढपी तसे रडणारे रडपी) लोक कार्यालयातर्फे पुरवले जात नाहीत. रडण्याची जबाबदारी अजूनही नवरीच्या नातेवाईकांना (ईच्छा नसली तरी) पार पाडावी लागते.

Comments

Rated 0 out of 5 stars.
No ratings yet

Add a rating
bottom of page