top of page

आवड

Updated: Apr 19

‘तुम्हाला कशाची आवड आहे?’ या प्रश्नाचं उत्तर बऱ्याच लोकांकडे नसते. माझ्या बाबतीत या प्रश्नाचं उत्तर ‘वाचन’ हे आहे. पुस्तकं हेच माझ्यासाठी ऑक्सीजन. सुरुवातीला जे मिळेल ते वाचत गेलो. जसं आपण श्वास घेताना त्या हवेत ऑक्सीजन किती याचा विचार करत नाही तसेच वाचन करताना त्यातून आपल्याला काय मिळणार याचा विचार केला नाही. कारण एखाद पुस्तकं वाचलं तर त्याचा मनावर काय परिणाम झाला हे अचूकपणे सांगता येत नसले तरी तो होत असतो एवढे नक्की.

फार मोठे तत्त्वज्ञान वाचनल्यानेच माणसात बदल घडतो असे नाही. कधीतरी एखादी वाचलेली छोटी पण प्रभावी कथा सुध्दा चांगले संस्कार देते. काही पुस्तकं वाचताना आपण फक्त वाचक न नसतो, ‘Time Travel’ सारखं काहीतरी होऊन आपण त्या पुस्तकातील घटनेचा एक भाग होऊन जातो.

पुस्तकांच्या निमित्ताने अजून एक चांगला गुरू मला मिळाला. मोबाईलचे व्यसन सोडविण्यासाठी वाचन हा एक चांगलं उपाय आहे असे मला वाटते. ध्यान करणे म्हणजे मन एकाग्र करणे असा सोपा अर्थ मला कळतो. इतर विचार मनामध्ये न येऊ देता मन शांत करण्यासाठी ध्यानाच्या अनेक पद्धती आहेत. माझ्यासाठी पुस्तक वाचन हेच मला एक प्रकारचे ध्यान वाटते. नेते, अभिनेते यांचा जास्त प्रभाव असणाऱ्या लोकांच्या झुंडीमध्ये मी मात्र व.पु., पु.ल., वि.स. अशा व्यक्तींच्या विचारांनी प्रभावित होतो. प्रत्येक व्यक्तीच्या स्वभावाकडे सकारात्मक दृष्टीने कसे पहावे हे मला पु.ल. देशपांडे यांच्या लिखाणातून समजले. आता जेव्हा वेळ मिळेल तेव्हा पुस्तकं वाचतो आणि इतर वेळी माणसांचे स्वभाव वाचतो. क्षणा क्षणाला ताज्या घडामोडी टीव्ही वर पाहण्यापेक्षा वृत्तपत्र वाचणे कधीही चांगले. इथे मी जे काही लिहिले आहे त्याची ऊर्जा कदाचित मला वाचनातून मिळाली असेल.

Comments

Rated 0 out of 5 stars.
No ratings yet

Add a rating
bottom of page