top of page

रस्त्यावरचा मी

Updated: Mar 11


या रस्त्याचं आणि माझं एक प्रकारचं नातं निर्माण झालं आहे. रोज कामाच्या ठिकाणी जाण्यायेण्यासाठी दिवसातील सरासरी दीड तास मी प्रवास करतो. रस्त्यावर आपल्या स्वभावाचा मुखवटा वेगळा असतो कारण तिथे आपल्याला ओळखणारे कोणी नसते. रस्त्यावर सर्वांचीच एकमेकांसोबत एक अज्ञात स्पर्धा चालू असते. स्वतःच्या वाहनाने जात असाल तर माझीच गाडी सर्वात पुढे असण्यावर आणि सार्वजनिक वाहनाने प्रवास करत असू तर सर्वात आधी चढण्यावर आणि बसायला जागा मिळवण्यासाठी धडपड चालू असते. ह्या सगळ्या गोष्टींसाठी आडमुठेपणा रक्तात उतरवावा लागतो. खड्डे चुकवत, यमाच्या रेड्या सारखी धावणारी अवजड वाहने यातून वाट काढत इच्छित स्थळी जिवंत पोहोचल्याचा मला फार आनंद होतो. पूर्वी विनाकारण हॉर्न वाजवणे असभ्य समजले जायचे, पण आता लाल सिग्नल असल्यावर वेळेचा सदुपयोग करण्यासाठी आम्ही लगेच मोबाईल घेऊन रिल्स बघत बसतो. सिग्नल सुटल्यावर कोणी तरी हॉर्न वाजवत आम्हाला मोबाइलच्या आभासी दूनियेतून रस्त्यावर आणून एक प्रकारची समाजसेवा करत असतो. सध्या सगळ्यात जास्त पैसे कोण कमवत असेल तर फ्लेक्स प्रिंटिंग वाले असे मला वाटते. कारण चौकाचौकात शुभेच्छा देणाऱ्या फ्लेक्सची खूप गर्दी झाली आहे, मागे एकदा मी नागपंचमीच्या शुभेच्छा देणारे एका राजकीय व्यक्तीचं फ्लेक्स बघितले आणि या सणानिमित्त त्यांनी नागीण डान्स स्पर्धा आयोजित केल्या होत्या. आता फक्त गुड मॉर्निंग, गुड नाईट चे फ्लेक्स बघायला मिळाले म्हणजे मी कायमचा झोपायला मोकळा. रस्त्यावर सगळ्यात सुखी आणि कबुतरांसारखी वाढत जाणाऱ्या वाहनांची संख्या म्हणजे रिक्षा. त्यांना ना पार्किंगची चिंता, ना नियम पाळणे बंधनकारक. सरळ रस्त्यावरही घाटात गाडी चालवल्यासारखे नागमोडी रिक्षा चालवतात. मी एका लहान मुलाला सांगत होतो की पायी चालताना फूटपाथ वरून चालावे, तर तो उलट माझ्या अज्ञानावर हसला आणि म्हणाला की ‘काका फूटपाथ भेळपुरीच्या हातगाड्या उभ्या करण्यासाठी बांधले जातात एवढे पण नाही का माहीत तुम्हाला’. त्याचं म्हणणं पण खरं होतं, तो जे लहानपणापासून बघत आला तेच त्याला सत्य वाटले. काही दिवसांपूर्वी माझी चारचाकी गाडी रस्त्यावर बंद पडली. आता अशा वेळी मागून येणाऱ्या गाड्यांना कळावे म्हणून सगळे लावतात तशी झाडाची फांदी तोडून लावावी म्हणून झाड शोधू लागलो. पुढे मागे दोन किलोमीटर गेलो पण झाड काय सापडले नाही. मग माझ्या लक्षात आल की आपण रस्ते मोठे करायच्या नादात सगळी झाडेच तोडली आहेत. पण एकदा झाली ती झाली चूक म्हणून मी आता आर्टिफिशियल झाडाची फांदी माझ्या गाडीच्या डिक्किमध्ये ठेवतो म्हणजे पुन्हा गाडी बंद पडली तर अडचण येऊ नये. आपण दुसऱ्या ग्रहावर पाणी शोधण्याच्या मोहिमा यशस्वी पार पडल्या असे कुठेतरी वाचले होते, पण न तुटणारी आणि न खचणारी चेंबरची झाकणे आपण का तयार करू शकत नाही यावर मी पुढच्या जन्मी शास्त्रज्ञ होऊन अभ्यास करणार आहे. या रस्त्याने माणसाचे अनेक पैलू जसे भांडणारे, नियम मोडून दोनशे रुपये देऊन सुटणारे, धक्के खात उभा राहून प्रवास करणारे, काळा धूर फुफ्फुसात शोषणारे आणि अपघातात मरणारी माणसे पहिली. याच रस्त्याने मोर्चे, दंगली, आंदोलने, मिरवणुका अशा अनेक गोष्टी पाहिल्या पण रस्ता नेहमी वाहता राहिला.

1 Comment

Rated 0 out of 5 stars.
No ratings yet

Add a rating
Rated 5 out of 5 stars.

😅

Like
bottom of page